अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अमरधाम स्मशानभूमीतील मोक्षधाम विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गांधी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. नगर शहरातील बाजारपेठेतून बंद रुग्णवाहिकेतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना कार्यकर्ते शोकाकुल झाले होते.
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले होते. राज्य शासनाच्या विशेष परवानगीने त्यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी ४ वाजता रुग्णवाहिकेद्वारे नगरमध्ये आणण्यात आले. बुरूडगाव रोडवरील त्यांच्या निवासस्थानी रुग्णवाहिका आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीय, नातेवाइकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि लगेच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रुग्णवाहिकेत बंदपेटीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवाला भाजपच्या झेंड्याने लपेटण्यात आले होते.
अंत्ययात्रेत नगर शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आले होते. लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेताना अनेकांचे डोळे पाणावले. सामाजिक अंतर राखण्याचे, मास्क लावण्याचे पोलीस ध्वनिक्षेपकाहून आवाहन करत होते. अंत्ययात्रेत गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंत्ययात्रेच्या अग्रभागी सुवेंद्र गांधी होते. त्यांच्यासमवेत शिवसेना- भाजपचे कार्यकर्ते, नगरसेवक होते.
ठिकठिकाणी पुष्पवृष्टी
गांधी यांचे निवासस्थान, आनंदधाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट यार्ड चौक, बंगाल चौकी, चर्च रोड, गांधी यांचे जुने निवासस्थान, माणिक चौक, नगर अर्बन बँक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेताजी सुभाष चौक, लक्ष्मी कारंजा येथील भाजप कार्यालय, आनंदी बाजार, नालेगावमार्गे अंत्ययात्रा नालेगावमध्ये पोहोचली. अंत्ययात्रेदरम्यान ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. अर्बन बँक अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही त्यांना पुष्पचक्रे वाहिली. अंत्ययात्रा भाजप कार्यालयाजवळ आल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, सुनील रामदासी, शहराध्यक्ष भय्या गंधे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यालयाच्या इमारतीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली.
नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीतील मोक्षधाम विद्युतदाहिनीत दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र देवेंद्र व सुवेंद्र यांनी विधी पार पाडले. त्यापूर्वी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार नीलेश लंके, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.