अहमदनगर/केडगाव : गानसम्राज्ञी लता मंगेशकर राज्यसभेच्या खासदार असताना त्यांच्या निधीतून नगर तालुक्यातील पांगरमलसारख्या दुर्गम भागात झालेली विकासकामे आजही मजबूत स्थितीत आहेत. त्यांच्या निधीतून झालेल्या कामांमुळे भटक्या विमुक्त जाती-जमातींमधील मुलांचे शिक्षण सुकर बनले. त्यांची कामे आजही पांगरमल रहिवाशांसाठी ‘यादगार लम्हे’ बनून उभी आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी येताच पांगरमलमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. लतादीदी १९९९ ते २००५ या काळात राज्यसभेच्या खासदार होत्या. पंचायत समितीचे तत्कालीन सदस्य दिवगंत रामदास आव्हाड यांच्या प्रयत्नांमुळे लतादीदींचा निधी गावात येऊ शकला. आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लतादीदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी गावातील भटक्या विमुक्त जाती-जमातींतील मुलांसाठीच्या आश्रमशाळेसाठी निधीची मागणी केली होती. भटक्या जमातीतील मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी तत्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी २५ लाखांचा निधी पांगरमल आश्रमशाळेसाठी मंजूर केला. त्या निधीतून आश्रमशाळेत सभामंडप उभारण्यात आला. परिसरात काँक्रिटीकरण केले. आवारात एक हॉल, दोन खोल्या, पथदिवे यांची कामे केली. विशेष म्हणजे १७ वर्षांनंतरही ही सर्व कामे सुस्थितीत आहेत. आज त्यांच्या निधनाने पांगरमलच्या विकासासाठी लतादीदींनी केलेल्या अजरामर कामांची गावकऱ्यांना आठवण झाली.
पांगरमल आश्रमशाळेसाठी लतादीदींनी निधी देऊन गोरगरिबांप्रति असलेली तळमळ दाखवून दिली. गावासाठी त्यांचे योगदान ग्रामस्थ कधीही विसरू शकत नाहीत. त्यांच्या निधीमुळेच आजही अनेक भटक्या विमुक्त जाती-जमातींचे विद्यार्थी आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थांच्यावतीने लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.बापू आव्हाड,सरपंच, पांगरमल
आमचे बंधू स्वर्गीय रामदास आव्हाड यांनी लतादीदींकडे आश्रमशाळेसाठी निधीची मागणी केली होती. आश्रम शाळेत भटक्या विमुक्त जाती-जमातींचे विद्यार्थी शिक्षण घेणार असल्याचे समजताच लतादीदींनी मोठ्या मनाने आश्रमशाळेसाठी निधी दिला. या आश्रमशाळेतून भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन चांगले भविष्य घडविले आहे. याचे श्रेय लतादीदींना जाते. त्यांनी केलेली मदत कधीही विसरणार नाही.
भास्करराव भाऊराव आव्हाड,विश्वस्त, पांगरमल, आश्रमशाळा