अहमदनगर : स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखा कोंडलेला हिरा आम्ही बाहेर काढला आणि कोंदणात बसविला. त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात मंत्री केले. या दोन घरण्यांचे आमचे हे कायम ऋणानुबंध आहेत, त्यामुळेच मी या कार्यक्रमाला आलो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
स्व. विखे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ््यात ते मुंबई येथून आॅनलाईन बोलत होते. ते म्हणाले, शेतकºयांची संस्था ही काचेचं भांडे आहे. मोठे विखे पाटील हे कंजुष नव्हते तर काटकसरी करीत त्यांनी काम केले. स्व. विखे हे शेवटपर्यंत सामान्य माणूस म्हणूनच जगले, वागले. अंगाला साबणाऐवजी त्यांनी अंगाला चिखल लावला. जे काही घडले ते त्यांनी प्रामाणिकपणे आत्मचरित्रामधून मांडले आहे. बघत आणि भोगत ते पुढे आले. सामान्य, शेतकºयांसाठी ते जगले. आपला विचारही तोच ठेवला. गोरगरिबांसाठी देह वेचावा असे ठरवल्यानंतर काय करायचे,हे विचारायची कधीच त्यांना गरज पडली नाही. पक्ष बाजूला ठेवून दोन घराण्यांचे ऋणानुबंध असेच ठेवू या, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, स्व. विखे यांनी त्यांची परिस्थिती बदलली. त्यांनी व्यवस्थेचा दुष्काळ हटविला. आत्मचरित्रामध्ये अनेक आठवणी स्व. बाळासाहेबांनी दिल्या आहेत. अनेक प्रकल्पांमध्ये आराखड्यात बदल करण्याच्या वारंवार त्यांनी सरकारला सूचना केल्या. आराखडा करणाºयांना वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे अनेक आराखडे बदलले. सहकारी चळवळ, कारखाने उभारणीसाठी त्यांनी जी मेहनत घेतली ती प्रेरणादायी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.