ब्राह्मणी : परीसरातील विविध धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा शामा नावाच्या अश्वाचा बुधवारी सायंकाळी विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. लाडक्या अश्वाची निधनाची वार्ता समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.अश्वप्रेमी शामचे मालक किसन परसराम पटारे हे नेहमीप्रमाणे शामचा सराव करून घेत होते. दरम्यान टांग्यासोबत वेगात असलेल्या शामाला गतीचा अंदाज आला नाही. रस्त्यालगत असलेल्या विहिरीत त्याचा तोल गेला. क्षणाचा विलंब न करता शामला वाचविण्यासाठी किसन पटारे, अर्जुन पटारे व भिमा पटारे यांनी विहिरीत उडी टाकली. मात्र तोपर्यंत अश्वाने तळ गाठला. त्यामुळे त्याला वाचविण्यात अपयश आले. यावेळी परिसरातील चाहत्यांनी गर्दी केली. लाडक्या अश्वाचा मृत्यू झाल्याने पटारे कुटूंबाला अश्रुु अनावर झाले. सायंकाळी उशीरा शोकाकुल वातावरणात शामावर माणसाप्रमाणे विधिवत अत्यसंस्कार करण्यात आले. पूर्वीपासून अश्व पालनाची आवड असलेला पटारे परिवार शामचा दशक्रियाचा विधी करणार आहे. ‘‘तीन वर्षांपूर्वी शामला वांबोरीतील नातेवाइकांकडून विकत घेतले. बहुतांश दिवस आजारपणात गेले. मोठा खर्च करून उपचार केला. पोटचा मुलाप्रमाणे सांभाळ केल्याचे शामचे मालक किसन पटारे यांनी सांगितले.
लाडक्या शामचा विहिरीत पडून मृत्यू : विधिवत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 4:25 PM