नाशिक शहर व परिसरात मंगळवारी अचानकपणे थंडीचा कडाका वाढला. नाशिकमध्ये किमान तापमानात वेगाने घसरण झाल्याने या हंगामातील सर्वांत नीचांकी 9.8 अंश सेल्सिअस नोंद झाली. तर निफाडला देखील हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. निफाडच्या गहू संशोधन केंद्रावर आज 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
भारतीय हवामान खात्याकडून सोमवारपासून पुढे आठवडाभर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत किमान तापमान 12 अंशांपेक्षा खाली घसरले नव्हते. मात्र मागील तीन दिवसांत थेट सहा अंशांनी तापमान घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना आता जाणवत आहे. यानुसार रविवारी रात्रीपासूनच थंडी नागरिकांना जाणवू लागली होती. रात्री थंड वारे वेगाने वाहू लागल्याने सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान थेट 9.8 अंशांपर्यंत खाली आले.
या हंगामात पहिल्यांदाच इतके कमी किमान तापमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढताच नागरिकांकडून पुन्हा ऊबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जाऊ लागला आहे. तसेच सकाळी व संध्याकाळी गोदाकाठावर व शहराजवळच्या खेड्यांत, तसेच शहरी भागातील गावठाण परिसरातही शेकोट्यांचा आधार रहिवासी घेतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. हा संपूर्ण आठवडा थंडीचा राहणार आहे. यामुळे ऊबदार कपड्यांना मागणी वाढणार आहे. दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागा वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
आठवडाभरापूर्वी थंडी पूर्ण गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत होते. आता मात्र थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. यासोबतच वातावरणात उष्माही आहे. कारण दिवसभर ऊनही कडक पडत असून, कमाल तापमान संध्याकाळी 32 ते 30 अंशांच्या जवळपास स्थिरावत आहे. आठवडाभरापूर्वी ढगाळ हवामानासह किमान तापमानही 17.7 अंशांपर्यंत वाढलेले होते. या आठवड्यापासून वातावरणाचच्या स्थितीमध्ये अचानक वेगाने बदल होत असून, किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. कमाल तापमानही २ अंशांनी खाली आले आहे. आकाश निरभ्र राहत असून, थंडीचा कडाका वाढू लागला आहे.
शहराचे सात वर्षांचे किमान तापमान असे...(अंश सेल्सिअसमध्ये)22 जानेवारी 2017 5.5 अंश सेल्सिअस, 29 डिसेंबर 2018 - 5.1 अंश सेल्सिअस, 09 फेब्रुवारी 2019 9.1 अंश सेल्सिअस, 17 जानेवारी 2020 6.0 अंश सेल्सिअस, 09 फेब्रुवारी 2021 - 9.1 अंश सेल्सिअस, 25 जानेवारी 2022 - 6.3 अंश सेल्सिअस, 10 जानेवारी 2023 - 7.6 अंश सेल्सिअस.