अहमदनगर : दीड वर्षांपासून बंद असलेल्या महापालिकेच्या शहर बससेवेचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन झाले़ उद्घाटनाच्या कार्यक्रमात ही सेवा सुरू करण्यात आमचेच योगदान असल्याचे सांगत माजी महापौर आणि विद्यमान महापौर यांच्यात चांगलाच श्रेयवाद रंगला़ पालकमंत्री राम शिंदे यांनी दोघांचेही खरे असल्याचे सांगत आता नगर शहराचा सर्वांनी मिळून सर्वांगीण विकास करण्याचा नारा दिला.उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ़ सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार अनिल राठोड, माजी महापौर सुरेखा कदम, सेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आदी उपस्थित होते़यावेळी बोलताना माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, आपण स्वत: महापौर असताना शहरात नव्याने बससेवा सुरू करण्यास मंजुरी दिली़ आज नगरकरांसाठी या सेवेचा शुभारंभ होत आहे़ यावर महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, बससेवला मंजुरी मिळाली तेव्हा मी स्थायी समितीचा सभापती होतो़ आता महापौर झाल्यानंतर ही सेवा सुरू झाली़ माजी आमदार राठोड यांनीही शिवसेनेनेच शहर बससेवा सुरू केल्याचा उल्लेख केला़ राधाकृष्ण विखे म्हणाले, नगरची महापालिका सतत विविध कारणांसाठी चर्चेत राहते. आज मात्र येथे एक चांगले काम झाले आहे़ महापौर वाकळे यांचा पायगुण चांगला आहे़ त्यांच्या काळात ही सेवा सुरू झाली़ आता मागचे विसरून येणाऱ्या काळात एकत्र येऊन चांगले काम करू़ जे लोकसभेत झाले तेच विधानसभेतही होईल़ माझ्यासह पालकमंत्री राज्यातून तर खासदार केंद्रातून नगरसाठी निधी आणतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़आधीच्या भाषणांचा संदर्भ घेत खासदार विखे म्हणाले, मी खासदार झाल्यानंतर नगरमध्ये बससेवा सुरू झाली़ माझाही पायगुण चांगला आहे़ विखेंच्या या वक्तव्याला उपस्थित नेत्यांनीही मनमुराद दात दिली़ पाच वर्षे नगर शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले़ शिंदे म्हणाले, आज सेना-भाजपाचे सर्व नेते एकाच व्यासपीठावर आहेत़ आचारसंहितेच्या आधी विकासकामे मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न आहेत़प्रास्ताविक योगेश गुंड यांनी केले़ कार्यक्रमाला उपमहापौर मालन ढोणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, स्वप्निल शिंदे, मनोज कोतकर, अभय आगरकर, रावसाहेब खेवरे, रमाकांत गाडे आदी उपस्थित होते़नगरकरांसाठी अशी आहे बस सेवामे दीपाली ट्रान्सपोर्ट या अभिकर्ता संस्थेच्या माध्यमातून महपालिकेने शहरात बससेवा सुरू केली आहे़ शहरातील इम्पिरिअल चौकातून नागापूर, विळदघाट, पाईपलाईन रोड, निर्मलनगर, भिंगार, केडगाव, व्हीआरडी आदी मार्गावरून सध्या दहा बस सुरू राहणार आहेत़ येत्या काही दिवसांत आणखी बस वाढविण्यात येणार आहेत़ प्रत्येक मार्गावर पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध राहणार आहे़ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीस यंत्रणा बसविण्यात आली आहे़ तसेच शालेय विद्यार्थ्यांना पास देण्यात येणार आहेत़ ५ ते जास्तीत जास्त २० रुपये इतका तिकिटाचा दर आहे़उड्डाणपुलाचा दोन दिवसांत कार्यरंभ आदेशनगर शहरातील उड्डाणपुलाचे याआधी अनेकवेळा नारळ फुटले़ आता मात्र येत्या दोन दिवसांत कार्यरंभ आदेश निघून आठ दिवसांत कामाला प्रारंभ होणार आहे़ याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात आली आहे़ असे खासदार सुजय विखे यांनी सांगितले़
शहर बससेवेचा शुभारंभ : उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादाची बस धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:47 PM