भेंडा : सध्या काढणी व मळणी होत असलेला हरभरा शेतकऱ्यांनी भेंडा (ता.नेवासा) येथील हमीभाव केंद्रावर विक्रीस आणून ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव घ्यावा, असे आवाहन किसान समृद्धी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापक स्वराज गरड यांनी केले आहे.
बाजारात सध्या हरभऱ्याचे दर ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत. सरकारने हरभरा हमीभाव ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केलेला आहे. हमीभाव केंद्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा आणल्यास त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. हरभरा पिकाची नोंद ७/१२ वर करून आधारकार्ड व बँकेच्या पुस्तकाची झेराॅक्स प्रत शेतकरी कंपनीच्या कार्यालयात देऊन नोंदणी करावी, असे आवाहन किसान समृद्धी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक राम गरड यांनी केले.