श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांच्या घशात घातलेल्या जमिन व्यवहारांची तसेच आदिवासींच्या जमिनी लवासामध्ये हडप केल्याची श्वेतपत्रिका बाहेर काढणार आहे, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआय तसेच इतर मित्र पक्षांच्या संकल्प महाविजय मेळाव्यात विखे पाटील येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बोलत होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, पवारांच्या स्वतःच्या कारखान्यातून पैसा मनी लाँड्रिग झाला. त्याची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की तलाठी भरती प्रकरणी श्वेतपत्रिका काढा. सरकार म्हणून आम्ही त्यासाठी तयार आहोत. मात्र पुण्याजवळच्या आदिवासींच्या जमिनी
लवासा प्रकल्पामध्ये हडप केल्या. त्यावर महसूलमंत्री या नात्याने मी श्वेतपत्रिका काढतो. शरद पवार यांना त्यांचे सहकारी सोडून गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. सोबत जे काही मोजके लोक आहेत राहिले आहेत, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ते काहीही भाषा वापरत आहेत. तलाठी प्रकरणात रोहित पवार यांनी ३० लाख रुपयांचे रेट कार्ड होते, असा आरोप केला. मात्र प्रत्यक्षात आजवर झालेली ही सर्वाधिक पारदर्शक तलाठी भरती होती. यामध्ये कोणाचेही हितसंबंध पाहिले गेले नाही असे विखे म्हणाले.