अहमदनगर : दशरथ सावंत! गेली सहा-सात दशके अकोले-संगमनेरच्या सामाजिक-राजकीय जीवनात निर्माण झालेलं एक वादळ. अकोल्याजवळील रूंभोडी हे सावंतांचं गाव. ते प्रवरेकाठी वसलेलं आहे़ तिथे विश्वासराव आणि जयंतराव हे दोन देशमुख बंधू. एक अंधश्रद्धा निर्मूलनवाला तर दुसरा राष्टÑ सेवा दलवाला. गाव सधन. चर्चेच्या केंद्रस्थानी कायम़ तिथून सावंत एक चांदण्याचं घरटं विणत गेले. चळवळींच्या आश्रयांचं ते घरटं होतं. सावंत नावाचं वादळ तिथून निर्माण झालं़ते साल १९७२ चे. आम्ही विद्यार्थीदशेत होतो. सावंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले. पण काँग्रेस पक्षातून! सेवा दलाच्या मुशीत तयार झालेले आम्ही. सावंतांची भाषा विद्रोही, क्रांतीची. पटायला जड जात होते. लवकरच त्यांचे काँग्रेस पक्षात बिनसले. ‘गरिबी हटावचा नारा’ देत सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने जून १९७५ ला देशावर आणीबाणी लादली. त्यांनी याला विरोध करत सत्याग्रह केला. १८ महिने तुरूंगात गेले. तोपर्यंत तालुक्यातील संघर्षवाल्या तरुणांचे ते गळ्यातील ताईत झाले होते. ‘दशरथ सावंत झिंदाबाद’ ही तेव्हाच्या तरुणांची एक उत्स्फूर्त घोषणा वातावरणात घुमत होती. ते अनेकांचा श्वास झाले होते. भूमिमुक्ती आंदोलन, म्हाळादेवी धरणाचा लढा, प्रवरेच्या पाण्याच्या हक्कासाठीचा लढा, हजारो शेतकºयांचा तो ‘रूम्हणे मोर्चा’, भंडारदरा चाक बंद आंदोलन, राममाळ मुक्ती लढा, मीटर हटाव आंदोलन या ठळक प्रमुख आंदोलनांसह छोट्या-मोठ्या आंदोलनांची एक भली मोठी साखळी ऐंशीच्या दशकात उभी राहिली. ती केवळ सावंत यांच्यामुळे़ आजच्या निळवंडे धरणाचे भूमिपूजन म्हाळादेवी येथे झाले होते. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न आणि सुपिक जमीन जात असल्याने जीव धोक्यात घालून सावंतांनी त्या जागेला विरोध केला. परिणामी सरकारला जागा बदलावी लागली. अकोल्यात याच दशकात (१९८०) झालेली पाण्याची ‘लढाई’ ही एक ऐतिहासिक चळवळ झाली. तिने प्रवराकाठ सुजलाम सुफलाम केला. तोपर्यंत अशक्य मानली जाणारी ‘कमिटेड वॉटर’ची संकल्पना सावंतांच्या आंदोलनाने उडवून लावली. याचे संगमनेर अकोल्यात दूरगामी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिणाम झाले. राजकारणात उत्तर नगर जिल्ह्याची पूर्वेकडील मोनोपॉली संपविली गेली. प्रवरेचे पाणी उचलण्याच्या रीतसर परवानगीमुळे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्य म्हणजे हे आंदोलन अकोल्याच्या शेतकºयांचे होते. पाण्याच्या इतिहासात सावंत ठळक अक्षरात छापले गेले आहेत.त्यांचा संघर्ष थांबत नाही. त्यांच्यासाठी जीवनभर ती एक निरंतर प्रक्रिया राहिली. ते अनेकदा निवडून गेले. जिल्हा परिषदेवर गेले. संगमनेर, अकोले साखर कारखान्यावर अनेकदा निवडून गेले. मात्र तेथेही शेतकरी हितासाठी भांडणारा नेता ही त्यांची प्रतिमा कायम राहिली़ त्यामुळे सत्तास्थानी असणाºयांशी त्यांचे कधी पटले नाही. राजीनामा देत त्यांनी संघर्ष सुरुच ठेवला़ मात्र, याला विरोधक ‘पळपुटेपणा’ म्हणत. संधीसाधूपणा म्हणत. परंतु एखाद्या ठिकाणी चाललेले चुकीचे, विसंगत काम थांबवण्याची ही मोजलेली वैयक्तिक किंमत आहे, असे मात्र कुणाला वाटले नाही. पटलेही नाही़ परिणामी लौकिकदृष्ट्या सावंतांचा अनेकदा पराभवही दिसून आला किंवा तसे चित्र निर्माण झाले. मात्र आयुष्यात निराश होताना ते कधीच दिसले नाहीत. कायम शोधात, नवा विचार, नवी मांडणी, नवा संघर्ष, संकल्पनांची उलथापालथ.१९८० च्या दशकात सावंत हे शरद जोशी या वादळाच्या संपर्कात आले. औरंगपूर येथे शेतकºयांच्या लिप्ट योजनेला स्वत: खांबावर चढून त्यांनी वीज कनेक्शन जोडून दिले होते. सत्याग्रह केला होता. खरे तर हा त्यांचा टर्निंग पॉइंटच म्हणायचा. शरद जोशींच्या कांदा आंदोलनासाठी त्यांनी थेट चाकणचा रस्ता धरला आणि पुढील दहा-बारा वर्षे ते निखळ जोशीमय झाले. त्यांची जोशींबरोबर ‘व्हेव्हलेंथ’ जुळली होती. भारतातील विषमता निर्मूलनाचे काम जोशींकडूनच होऊ शकते असा विश्वास त्यांना वाटू लागला होता. भारतातील शेतकरी वर्ग हा ‘नाही रे’ वर्गात मोडणारा. तो कायमच तोट्यात़ छोट्या शेतकºयांचा तोटा छोटा, मोठ्यांचा तोटा मोठा़ पण तोटा कायम़ एकूणच काय शेती हे कलमच तोट्यात अशी ती मांडणी...पण इथेही माशी शिंकलीच. १९९० नंतर खुले धोरण आले. शरद जोशींनी त्याचे स्वागत केले. शेतकरी संघटनेत फूट पडली. सावंत जोशींपासून दूर गेले. कारण ते (सावंत) म्हणत की, जगात कुठेही खुली व्यवस्था नाहीच मुळी. तेथील सरकार शेतमाल घेते, शेतकºयांना रास्त दाम देते. मग नंतर ते तोट्यात का होत नाहीत. असे ते मतभेदाचे मुद्दे असत. मात्र जोशी यांच्या प्रामाणिकपणावर सावंतांनी कधीच आक्षेप घेतला नाही. आजही सावंतांची जोशी यांच्या नॅशनल अॅग्रीक्लचर पॉलिसीच्या मांडणीवर श्रद्धा आहे. काहींना सावंत गोंधळलेले वाटतात. कायम अस्वस्थ! ही काय अवस्था आहे! मी त्यांना थेट विचारले. त्यावर त्यांचे उत्तर फार साधे आहे. ते म्हणतात, अशी व्यवस्था हवी आहे की, जिथे समाजाच्या किमान गरजा पूर्ण होतील. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यातील किमान तरी समाजातील सर्व घटकांना मिळाले पाहिजे. तो त्यांचा कायदेशीर हक्क हवा आहे. सावंत बोलत राहतात. मोठी-मोठी सामाजिक स्वप्ने त्यांच्या डोळ्यातून ओसंडत असतात. त्यांच्या मागे मनाचा निर्धार असतो. ‘होंगे कामयाब’ चा आशावाद असतो. झाडांच्या, प्राण्यांच्या जशा दुर्मीळ प्रजाती असतात तसे संगमनेर-अकोल्याच्या रानातले. माणसातले ते एक. प्रश्नांचा, जीवनाचा शोध घेण्याची धडपड करणारा, तर्कभक्त!सावंत स्वत:च्या दु:खात गुरफटून गेलेले कधी दिसले नाही. इतरांच्या, समूहांच्या, वंचितांच्या दु:खात ते विरघळत आले. म्हणूनच त्यांचे विचार एका माणसाचे रहात नाहीत. त्यांच्या वागण्यात त्यांच्या हृदयाची स्पंदने नसतात. त्यात तुमच्या-माझ्या सर्वांची स्पंदने असतात. तिथूनच संकल्पनांची उलथापालथ होते. आपल्या बौद्धिक मखलाशीने लाचारीलाच नैतिकतेचे अधिष्ठान देणाºया महाराष्टÑातील कथित बुद्धिवंतांचा बुरखा फाडण्याचे काम त्याच घरट्यातून होते. आमच्या पिढीचे भाग्य हे की, हे घरटे गुंफणारा आज ऐंशी पार करून दिमाखात आहे. रात्र पहाटेला भिडेपर्यंत त्यांचा संघर्ष अनुभवत आहोत. सावंतांचा संघर्ष हीच अनेकांच्या आयुष्यातली वासंतिक झुळूक आहे. भोवती वसंत असेल नसेल सावंतांच्या संघर्षाच्या लढ्याचे अनेक डौलदार हिरवेकंच पदर डहाळी होऊन बहरतच राहतील.
लेखक - शांताराम गजे, मुक्त पत्रकार