अरुण वाघमोडेअहमदनगर : निवडणुकीत वैचारिक मुद्यांवर चर्चा करण्यापेक्षा विविध पक्षांतील नेते एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात धन्यता मानत आहेत़ अशा परिस्थितीत मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे असे मत ज्येष्ठ कवी व साहित्यिक चंद्रकांत पालवे यांनी व्यक्त केले़एक साहित्यिक म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?पालवे: लोकशाहीत मतदान ही प्रक्रिया अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते़ सर्वांनी शांततेत मतदान करावे़ सध्या प्रचाराच्या निमित्ताने राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत़ गेल्या काही वर्षांत राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चालला आहे़ निवडून येण्यासाठी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत़ नगरमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने एकेकाळी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या़ त्यावेळी वैचारिक मुद्यांवर निवडणूक लढविली जायची़ सध्या मात्र वैचारिकतेला तिलांजली देत एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यातच राजकीय नेते धन्यता मानत आहेत़लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?पालवे: सध्या देशातील परिस्थिती पाहिली तर सुशिक्षित बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवरचे विषय आहेत़ आज उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांना अत्यल्प पगारावर कुठेतरी काम करावे लागत आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत़ निवडणुकीत हे मुद्दे केंद्रस्थानी असायला हवेत़ गेल्या काही वर्षांत प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेत का? आणि येणाºया काळात हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काय नियोजन आहे़ यावर चर्चा होणे गरजेचे आहे़ जनतेनेही विकासाचे मुद्दे विचारात घेऊनच आपल्या मतदानाचा हक्क बजवावा़तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?पालवे: मी साहित्य परिषदेवर काम करतो तसा एक ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सरकारी नोकर आहे़ त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील प्रश्नांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला आहे असे वाटत नाही़ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून एक लाख स्वाक्षºयांचे निवेदन पंतप्रधानांना दिले तसेच नगरचे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे व सदानंद मोरे यांनी याबाबत मोठा अहवाल सादर केलेला आहे़ या मागणीवर मात्र अद्यापपर्यंत विचार झालेला दिसत नाही़ ज्यांनी सरकारी खात्यात प्रामाणिकपणे सेवा केली अशा अनेक सेवानिवृत्तांना योग्य निवृत्तीवेतन मिळत नाही़ देशातील सध्या ६० लाख सेवानिवृत्तांचा प्रश्न आहे़नवीन मतदारांना काय आवाहन कराल?सध्या देशात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे़ हा मतदारच येणारे सरकार ठरविणार आहे़ त्यामुळे तरुणांनी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करावे़ कुठल्याही भूलथापांना बळी न पडता तरुणांनी कोणत्या उमेदवारांना विकासाची जाण आहे हे समजून घेऊन तरुणांनी मतदान करावे़
एकमेकांची प्रतिमा मलिन करण्यात नेते धन्यता मानतात :साहित्यिक चंद्रकांत पालवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 3:50 PM