आघाडीचे सरकार टाइमपास सरकार : राम शिंदे यांचे टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 03:40 PM2021-06-26T15:40:27+5:302021-06-26T15:41:32+5:30
राज्यात असलेले तीन पक्षांचे आघाडी सरकार कुचकामी असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा, ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप होऊ देणार आहे, असा इशारा माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला.
अहमदनगर : राज्यात असलेले तीन पक्षांचे आघाडी सरकार कुचकामी असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा, ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप होऊ देणार आहे, असा इशारा माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला.
आघाडी सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने शनिवारी नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिंदे यांच्यासह खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जेष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, अक्षय कर्डिले, नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, अभिलाष घिगे , संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे , शिवाजी कार्ले, हरिभाऊ कर्डीले, श्याम पिंपळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राम शिंदे म्हणाले की, राज्य सरकार सर्व आघाड्यांवर फेल होत आहे. राज्य सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आले, तसेच मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले. त्याचे सरकारला गांभीर्य नाही. जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. समाज त्यासाठी रस्त्यावर उतरेल, अशी टीका शिंदे यांनी केली.
सुजय विखे म्हणाले की, आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. मराठा, ओबीसींचे आरक्षण हे सरकार टिकू शकले नाही. म्हणून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. सरकारने योग्य मांडणी करून आरक्षणाबाबत ठोस पाऊल उचलले नाही तर येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
शिवाजी कर्डिले यांनी आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. सरकारने निवडणुकांबाबत आपला निर्णय बदलला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले.