अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली आहे. मात्र तांत्रिक अडचणी येत असल्याने बहुतांशजण प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जाऊनच लायसन्स काढत आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात पुन्हा गर्दी वाढत आहे.
परिवहन विभागाने १४ जूनपासून सर्वच प्रकारचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था केली आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून लायसन्ससाठी परीक्षा देता येते. बहुतांशी जणांना मात्र ही प्रक्रिया माहिती नाही. ज्यांना माहिती आहे, त्यांच्याबाबतही कधी सर्व्हरची समस्या, तर कधी इंटरनेट मिळत नाही. त्यामुळे बहुतांशजण ऑनलाईनचा नाद सोडून पुन्हा कार्यालयात येऊनच लायसन्स काढणे पसंत करत आहेत.
---------------------
ऑनलाईनसाठी अडचणी काय?
१. ज्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावयाची आहे, त्याला आधाकार्ड लिंक नसणे.
२. अनेकदा सर्व्हरची समस्या निर्माण होते.
३. परीक्षार्थींना प्रश्नच नीट समजत नाही. त्यामुळे परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे.
४. ग्रामीण भागातील बहुतांशजणांना लॉनलाईन प्रक्रिया किचकट वाटत असल्याने ते ऑफलाईनलाच पसंती देतात.
-------------------
...म्हणून आरटीओ कार्यालय गाठले
ऑनलाईन लायसन्स कसे काढायचे, त्याची वेबसाईट कोणती हे माहीत नाही. गावाकडे मार्गदर्शन करायलाही कोणी नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात येऊनच लायसन्स काढले आहे. वेळ गेला, पण काम झाले.
- एक लायसन्सधारक
---------------------
कोरोना काळात आरटीओ कार्यालयात गर्दी होऊ नये, या उद्देशाने लर्निंग लायसन्स ऑनलाईन देण्याची सुविधा आहे. लायसन्स घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रथम ऑनलाईन प्रक्रिया समजून घ्यावी. मोबाईल क्रमांकाला आधारकार्ड लिंक करून घ्यावे. सर्व्हरची समस्या असल्यास अडचणी येऊ शकतात. अशावेळी ऑफलाईनचीही सुविधा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनसाठीच प्रयत्न करावेत.
- दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर
------------------------