निघोज : कुकडीचे पाण्याचे आवर्तन ५ जानेवारपर्यंत सोडावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू, अशा आशयाचे निवेदन निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, सरपंच ठकाराम लंके यांच्यासह शेतकऱ्यांनी आ. नीलेश लंके यांना दिले आहे.
सध्या निघोज (ता. पारनेर) व कुकडी कालव्याच्या पाणलोट क्षेत्रात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हरभरा, गहू, पशुखाद्य यांना पाण्याची गरज आहे. यावर्षी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच शेतीमालाला सातत्याने भाव नाही. कोरोना महामारीने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशातच निघोज व परिसरातील शेतीमालाला योग्य वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना यावर्षीही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. येत्या पाच तारखेपर्यंत पाणी न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष नामदेव थोरात, मळगंगा ग्रामीण ट्रस्टचे सहसचिव रामदास वरखडे, विश्वस्त अॕॅड. बाळासाहेब लामखडे, अमृता रसाळ, सोमनाथ वरखडे, खंडू लामखडे आदी उपस्थित होते.
----
कुकडी कालव्याला ५ जानेवरीपर्यंत पाणी सोडल्यास पिकांना नवसंजीवनी मिळेल. शेतकऱ्यांचे होणारे लाखोंचे नुकसान टाळता येईल. आ. नीलेश लंके यांनी कुकडी कालवा समितीशी चर्चा करून लवकर पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
-चंद्रकांत लामखडे /रामदास वरखडे,
प्रगतिशील शेतकरी, निघोज
फोटो : ३१ निघोज निवेदन
कुकडी कालव्याला ५ जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन आ. नीलेश लंके यांना देताना निघोजचे शेतकरी.