अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमून दिलेल्या कर्तव्यावर कार्यरत असताना वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडून रेड झोनमध्ये (पुणे) गेलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश अहुजा यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहुजा यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ यामधील कलम ३ चा भंग केला असून त्यांच्या विरोधात कलम १८८ नुसार कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले होते. या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आहुजा यांच्याविरोधात शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.आहुजा गेले पुण्यालाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचा-यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांना पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाहीत, असे जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत. मोटार वाहन निरीक्षक आहुजा यांनी मात्र पूर्व परवानगी न घेता ते ६ मे रोजी वैद्यकीय रजा टाकून नगर येथील मुख्यालय सोडून रेड झोन असलेले पुणे येथे गेले. अधिका-याने शासकीय आदेशाचा भंग केल्याने जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाईचे आदेश दिले.
मुख्यालय सोडून रेडझोनध्ये प्रवेश; मोटार वाहन निरीक्षकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:52 AM