राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी सहा वाजता दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. २०० क्युसेकने पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या कालव्याखालील अडीच हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणाचा डावा कालवा ८ मे रोजी बंद करण्यात आला होता. शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी मुळा डाव्या कालव्याखालील शेतकºयांनी मुळा पाटबंधारे खात्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ऊस, कपाशी, चारा इत्यादी पिकांना दिलासा मिळणार आहे. मुळा डावा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी शेतक-यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कार्यकारी अभियंता गणेश नाननोर, उपअभियंता योगेश जोर्वेकर, शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी पाणी सोडण्याचे नियोजन केले. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १२ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. फुटबॉल उघडा पडल्याने वांबोरी चारीचे पाणी मागच्या महिन्यातच बंद झाले आहे.वीस दिवस चालणार आवर्तन भागडा चारीचे आवर्तन सुरु असून त्याखाली असलेले पंचेचाळीस तलाव भरण्यात येणार आहेत. डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन वीस दिवस चालणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पुन्हा उन्हाळी आवर्तन सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:33 AM