उन्हाळ्याची चाहूल लागताच आदिवासी पट्ट्यातील करवंदाच्या जाळ्या, तोरण, शिंदळ आदी फुलांनी बहरून जातात तर आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाच पक्क झालेला हा रानमेवा खाण्यायोग्य होत असतो. स्थानिक आदिवासी या काळात हा रानमेवा तोडून विक्रीसाठी राजूर, अकोले, संगमनेर आदी शहरांत घेऊन जात असतात. वर्षातून एकदा नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या या रानमेव्यास हमखास ग्राहक मिळतो. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो.
गतवर्षीही याच काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाला आणि ही सर्व रानफळे बाजारात विक्रीसाठी आलीच नाही.
याही वर्षी पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा पडला त्यातल्या त्यात आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव अधिक प्रमाणात झाला. त्यातच दळणवळणाची साधनेही बंद असल्याने या वर्षीही हा जंगलाचा रानमेवा झाडांवर आणि जाळ्यांवर तसाच राहिला असून झाडांवरच सुकू लागला आहे. याचा फटका स्थानिक आदिवासी समाजाच्या रोजगार निर्मितीवरही झाला आहे.
..........
मागच्या दीड दोन महिन्यांपासून हाताला काम नाही. सगळी माणसे घरीच बसून आहे. कसे दिवस काढायचे हा विचार पडलाय. मागच्या साली याच काळात हा महामारीचा रोग सुरू झाला. त्यामुळे तेव्हाही रोजगार बुडाला. आवंदा करवंदाच्या जाळ्या चांगल्या फुलल्या,करवंदही लगडली. या बरोबरच तोरण, शिंदळ, उंबर सगळीच पिकून गेल्यात. बाजारात नेली तर बाजारहाट सुटून दोन रुपये शिलेकीला पडायची. मात्र आताही महामारीन धुडकूस घातलाय.
- रामा गवारी, आंबित
( १२ करवंद)