जामखेड : जामखेड नगरपरिषदेचा माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाडसह इतर दोघाजणांवर जामखेड पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथील अशोक दत्ता बोबडे (वय २२, व्यवसाय वाहनचालक) यांनी जामखेड येथील खासगी सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड व त्यांचे साथीदार शेखर बाळासाहेब रिटे व एक अनोळखी असे तिघेजण तीन महिन्यांपासून बोबडे यांच्या घरी जाऊन एक लाख रुपये मागत होते.
दोन दिवसांपूर्वी सुरेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी अशोक बोबडे याच्या घरी गेले. त्यांनी लगेच आम्हाला एक लाख रुपये द्या, असे सांगितले. मात्र ती रक्कम देण्यास बोबडे यांनी असमर्थता दर्शविली. आज एवढे पैसे नाहीत. दोन दिवसांनी तुमचे पैसे देतो, असे तमे म्हणाले. मात्र गायकवाड यांनी बोबडे यांचे ऐकून न घेता, बोबडे यांचे वडील दत्ता बोबडे यांच्या नावावर असलेली, साधारण रुपये १ लाख ५० हजार रुपये (अंदाजे किंमत) असलेला टाटा कंपनीचा छोटा हत्ती, एक दुचाकी यांच्या चाव्या बळजबरीने काढून वाहने घेऊन गेले. त्यानंतर बोबडे यांनी वाहने परत देण्यासाठी फोन केला असता ‘आम्ही तुमची वाहने विकून टाकली,’ असे गायकवाड यांनी सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३२७, ३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे तपास करीत आहेत.