जावई येत आहेत
नगर तालुक्यातील वाळुंज येथे शहर बाह्यवळणाच्या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी खासदार सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांचे नावही नियोजित मान्यवरांमध्ये होते. मात्र कार्यक्रम संपत आला तरी जगताप येईनात. विखे यांचे शेवटचे भाषण सुरू झाले. आता जगताप येणार नाहीत म्हणून पाऊण तास भाषण केल्यानंतर विखे भाषण संपवणारच होते. तेव्हढ्यात कर्डिले म्हणाले, तुमचे भाषण लांबवा, आमचे जावई येत आहेत. यामुळे विखेंनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टोलेबाजी सुरू केली. ते म्हणाले, जगताप येईपर्यंत महाविकास आघाडीला झोडपतो, नंतर झोडपता येणार नाही. मात्र बरीच प्रतीक्षा करूनही जगताप येईनात म्हणून विखे भाषण थांबवून कर्डिले यांना म्हणाले, जावई कुठपर्यंत आले बघा ना, माझा घसा कोरडा पडला. विखे यांनी पाणी मागितले. पुन्हा भाषण सुरू केले. काही वेळाने जगताप कार्यक्रम स्थळी पोहोचले. त्यांना पाहून सुटलो मी, असे म्हणत विखे यांनी आपल्या लांबलेल्या भाषणाला पूर्णविराम दिला.