रामप्रसाद चांदघोडे -घारगाव : बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्याने शेळ्यांना वाचवायला गेलेल्या तरुणावरही बिबट्याने हल्ला केला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी शिवारातील सांगडेवाडी येथील ही घटना आहे. कैलास शंकर सांगडे ( वय-३१ ,रा. सांगडेवाडी, कुरकुंडी. ता. संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शनिवारी (दि.०३) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास दत्तू वायळ हे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील शेळ्यांवर हल्ला केला. यातील एक शेळी बिबट्याच्या तावडीत सापडली. वायळ यांनी आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या कैलास सांगडे या तरुणाने शेळ्यांच्या कळपाकडे धाव घेतली. बिबट्याने पकडलेल्या शेळीला व इतर शेळ्यांना बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सांगडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.
यात त्यांच्या मांडीला जखमा झाल्या आहेत. दोघांनीही आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पळून गेला. याबाबत कुरकुंडी गावच्या सरपंच शाहीन चौगुले व सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांना माहिती मिळाली असता, त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले. वनविभागाचे वनरक्षक एस.पी.सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सांगडे यांना उपचारार्थ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.