सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर) : सोमवारी पहाटे कोपरगावकरांना बिबट्याने दर्शन दिले दाट वस्ती असलेल्या बैल बाजार रोड, सुभाष नगर, बस स्टँडच्या मागील परिसरात बिबट्या दिसून आला. या बिबट्याने सुभाष नगर येथील मनोज जाधव या युवकावर हल्ला चढविला. परंतु मनोजने प्रतिकार करत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. या हल्ल्यात मनोज जाधव जखमी झाले आहेत.
सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर सर्वप्रथम बिबट्या दिसून आला. चार चाकी वाहनातून जाणाऱ्या नागरिकांनी त्यास पाहिले व आरडा ओरड करत त्यांनी इतर नागरिकांना जागरुक केले. त्यानंतर पोलिसांना संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना माहिती दिली. दरम्यान हा बिबट्या सुभाष नगर मार्गे बस स्थानक मागील बाजूस असलेल्या काटवनात गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. याचवेळी सुभाष नगर येथील मनोज जाधव या तरुणावर बिबट्याने हल्ला चढविला. मनोज यांनी प्रतिकार केल्याने बिबट्याच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. मनोज यांच्या पायाला जखम झाली आहे. त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. वन विभागाकडून दिवसभर बिबट्याचा शोध सुरू होता. सायंकाळी उशिरापर्यंत बिबट्या सापडला नव्हता.