सोनई : नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथे शिकारीच्या शोधात असलेला बिबट्याचा झाडाच्या फांदीत पाय अडकून मृत्यू झाला. जांभळीच्या झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.बेल्हेकरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर रानडुकरे आहेत. पिके वाचविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी डुकरे अडकण्यासाठी लोखंडी खटके लावले आहेत. शिकारीच्या शोधात बिबट्या या खटक्यामध्ये अडकला असावा. मजबूत खटका उपटून तो झाडावर चढला. मात्र झाडांच्या फाद्यात खटक्यासह त्याचा पाय अडकला. त्यामुळे बिबट्या उलटा होऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शुक्रवार रात्री तो झाड्याच्या फांद्यांमध्ये अडकला असण्याची शक्यता आहे.गावातील गोरक्षनाथ यळवंते हे शनिवारी सकाळी जनावरे चारण्यासाठी शेतात गेले असता झाडाला बिबटा उलटा लटकलेला दिसला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर सरपंच भरत बेल्हेकर, पोलीस पाटील अशोक वैरागर यांनी ही माहिती वनविभागाला कळविली. वनपाल झिंजुर्डे, वनरक्षक गाडे, वनकर्मचारी ढेरे यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला खाली घेतले.