लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव पाझर तलावाशेजारी एका आजारी बिबट्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या शनिवारपासून एकाच जागी बसून होता. शेतकऱ्यांनी वन विभागाला त्याबाबत कळविले. माञ कोणीही त्याची दखल घेतली नाही. मंगळवारी तलाठी, वन विभागाचे कर्मचारी यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेत पंचनामा केला.
स्थानिक शेतकरी प्रशांत वाघ यांनी बिबट्या शनिवारपासून एकाच जागी अर्ध मेलेला स्थितीत होता अशी माहिती लोकमतला दिली. आपण वन विभागाला त्याबाबत कळविले होते. एखाद्या वाहनाने त्याला धडक दिली असावी असा अंदाज वाघ यांनी वर्तविला. दोन ते तीन दिवसापासून सदरचा बिबट्या मृत्यूशी झुंज देत असल्याचे शेतकरी वाघ यांनी सांगितले. तलाठी राजेश घोरपडे यांनी पंचनामा करून बिबट्याला श्रीरामपूर येथे नेण्यात आल्याची माहिती दिली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वाघ, माजी सरपंच सचिन पवार, दादासाहेब झिंज यांनी केली आहे. बिबट्याला शवविच्छेदनासाठी कुरणपूर येथे आणण्यात आल्याचे वन विभागाचे अधिकारी विठ्ठल सानप यांनी सांगितले. अधिक भाष्य करण्यास त्यांनी टाळले.