श्रीगोंदा : तालुक्यातील म्हसे, वडगाव शिंदोडी शिवेवरील पठारे मळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सुंदरबाई दत्तात्रय देवीकर यांच्या चार शेळ्या जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाली. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सुंदरबाई देवीकर शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने या शेळ्यांवर हल्ला केला. यामध्ये चार शेळ्या जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाली. बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने भेदरलेल्या सुंदराबाई यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी जवळच असलेल्या खड्यात जाऊन बसल्या. त्यानंतर त्यांनी तेथून धूम ठोकली. वनरक्षक रणधवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. देवीकर परिवाराकडे चारच शेळ्या होत्या. या चारही शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. त्यामुळे देवीकर परिवाराला वन विभागाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील उक्कडगाव, वडगाव शिंदोडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. त्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने उक्कडगाव, वडगाव शिंदोडी परिसरात पिंजरे लावले, परंतु बिबट्याने हुलकावणी देत कुत्रे, शेळी, मेंढ्यांना लक्ष्य केले आहे.
म्हसे शिवारात बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:22 PM