अकोले : तालुक्यातील उंचखडक बुद्रक येथील कारमाळ शिवारात सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंज-यात अडकला.गेल्या महिन्याभरापासून बिबट्याने या परिसरात कुत्रे, शेळ्या, वासरांवर हल्ला करुन उच्छाद मांडला होता. शेतकºयांमधे भितीचे वातावरण होते. वनविभागास कळवून देखील पिंजरा लावला जात नव्हता. माजी सरपंच महिपाल देशमुख यांनी पुढाकार घेवून सोमवारी सायंकाळी वनविभागास पिंजरा लावण्यास भाग पाडले. त्यात शिकार म्हणून कुत्राही ठेवण्यात आला. पिंजरा लावल्यानंतर अगदी तासाभरातच बिबट्या जेरबंद झाला.चार ते पाच वर्षाचा नर बिबट्या आहे. त्याला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याचे गावकºयांचे म्हणणे असून त्यास पकडण्यासाठी वन विभागाकडून लवकरच पिंजरा लावण्यात येईल, असे वनविभागाचे अधिकारी एल.पी.शेंडगे यांनी सांगितले.