शिवाजी पानमंदसुपा : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावाजवळ असण-या मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आले. मोठ्या कसरतीने गावक-यांनी या पिलाला पकडून ठेवत वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने कॅरेटमध्ये हे पिलू ठेवले अन पिंजरा तिसरीकडेच लावला. रात्री मध्यरात्रीच्या सुमारास पिलाच्या मातेने तिच्या बाळाची सुटका करत धूम ठोकली. या लढाईत बिबट्या जिंकला अन वनविभाग हारला अशीच स्थिती पाहवयास मिळाली.मावळेवाडी गावच्या शिवारात प्रमोद घनवट यांच्या शेतात काल बिबट्याचे पिलू आढळून आल्यावर निखिल शेळके, योगेश शिंदे, करण पिसाळ, तुषार शिंदे या स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसाने त्याला अलगद जेरबंद करून ठेवले. वनविभागाच्या अधिका-यांना सूचना दिल्यावर घटना स्थळी पारनेरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा भिंगे व त्याचे सहकारी पोहोचले. त्यांनी जुन्नर येथील बिबट्या बचाव केंद्रातील अधिका-यासह पिलावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनाही पाचारण केले. मावळेवाडीच्या अमृते माळ शिवारात सगळीकडे ऊस असून मोठ्या प्रमाणावर झाडे वाढलेली आहेत बिबट्याचे पिलू आजारी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. ते पिलू साधारणपणे 2 ते अडीच महिन्याचे असल्याचे मनीषा भिंगे यांनी सांगितले. पिलू सापडल्याने त्याला मोठ्या पिंज-यात ठेवले तर त्याची आई त्याला सोडवण्यासाठी पिंज-यात प्रवेश करील, व ती पकडली जाईल असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. परंतु तसे न करता वनविभागाने फळे भरण्याच्या एका कॅरेट मध्ये त्याला ठेवले. वरून दुसरे कॅरेट ठेवले. पिंजरा तिसरीकडेच ठेवला. त्यावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. परिणामी बिबट्याची मादी येऊन मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी तिने त्या कॅरेट मधून पिलांची सोडवणूक करून ती पसार झाली. मोठा पिंजरा तसाच बिबट्याच्या प्रतीक्षेत रिकामा राहिला. त्यामुळे आता याच परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निश्चित झाल्याने मावळेवाडी व परिसरातील वाडेगव्हानच्या भागातील वाडी वस्तीवर राहणा-या ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने हाताशी आलेला बिबट्या सोडून दिल्याने या भागातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेतग्रामस्थांच्या सांगण्यानुसार बिबट्याच्या मादीसोबत अजून २ पिल्ले आहेत. त्यामुळे या एका पिलाला वाचवण्यासाठी ती पिंज-यात जाईल याची शाश्वती नाही. याउलट बंदिस्त झालेल्या पिलामुळे ती आक्रमक होऊ शकते त्यामुळे सध्या तरी तिला असे अडचणीत आणून पकडता येणे शक्य नव्हते. ग्रामस्थांनी पिंजरा लावून बिबट्या बंदिस्त करावा अशा मागणीचा ठराव करून दिल्यास त्यांची ही मागणी वरिष्ठांना कळऊन मग पिंजरा लावता येईल - मनीषा भिंगे वनपरिक्षेत्र अधिकारी, पारनेरयापूर्वी गव्हाणवडी, कुरुंद, मावळेवाडी , वाडेगव्हाण शिवारात बिबट्या दिसला होता . एकदा त्याने शेळीवर झडप घातली होती. १ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीची मासिक मिटिंग आहे त्या दिवशी मिटिंग मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करणारा ठराव करून संबंधित अधिका-यांना दिला जाईल.- उदय कुरकुटे, सरपंच मावळेवाडी