मिरी: नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील माका-हिवरे रस्त्यावर असलेल्या केदार वस्तीजवळ बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात होता.महालक्ष्मी हिवर े(ता.नेवासा) येथे गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याने धुडगूस घालून माका-हिवरे रस्त्यावरील केदार वस्ती येथील गणेश भोये यांच्या एका गायीसह अनेकांच्या शेळ्या, वासरे व कुत्र्यासह परिसरातील अनेक जनावरांचा फडशा पाडला होता. मच्छिंद्र लोंढे यांच्या एका शेळीला बिबट्याने भरदिवसा ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसांपूर्वीच हिवरे परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. पिंज-यात लावण्यात आलेल्या भक्ष्याच्या शोधात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्यानर जातीचा असून सुमारे सहा ते सात वर्षाचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बुधवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागास घटनेची माहिती दिली. वनरक्षक चांगदेव ढेरे यांच्यासह वनकर्मचारी ज्ञानदेव गाढे, सयाजी मोरे व मुक्ताजी मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पिंज-यासह बिबट्याला ताब्यात घेतले. वनविभागाच्या शासकीय वाहनातून नगर येथे ठिकाणी हलविण्यात आले.
नेवासा तालुक्यातील हिवरे गावात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:38 PM