जिल्ह्यात प्राथमिक शाळाखोल्या, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीचा मोठा प्रश्न आहे. गत वर्षात कोरोना संसर्गामुळे शासनाकडून निधी मिळाला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु, आता काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आपापल्या विभागांत तसेच गटांत विकासकामे करण्यासाठी सभापतींसह सदस्यही सरसावले आहेत. मात्र, त्यातून निधी पळवापळवीवरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी-पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. समन्वय नसल्याने विकासकामांच्या फायली प्रशासन, खातेप्रमुख, अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या दालनात अडकून पडल्या आहेत. यामुळे मंजूर कामे कधी सुरू होणार, मार्चअखेर निधी खर्च होणार की नाही, यावर निर्णय होत नसल्याने सभापती काशिनाथ दाते, सुनील गडाख, उमेश परहर, सभापती मीराताई शेटे, सदस्य संदेश कार्ले, अजय फटांगरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात उपस्थित असतानाही सभेकडे पाठ फिरविली. परिणामी, अध्यक्ष राजश्री घुले यांनी सभा तहकूब केली व नंतर अधिकाऱ्यांसमवेत तहकूब सभा घेतली. या सर्व प्रकारांवरून सत्ताधारी व पदाधिकाऱ्यांतच मतभेद असल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे.
स्थायी समिती बैठकीकडे चारही सभापतींची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:39 AM