ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरअंगणवाडीतील बालकांना आता पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. सरकारने अंगणवाडी बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. लवकर अंगणवाडी सुपरवाईजर यांना अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अंगणवाडीतील बालकांना शिक्षणाचे धडे मिळणार आहे. जिल्ह्यातील साधारण दोन लाख बालकांना याचा फायदा होणार आहे. सध्या अंगणवाडीत बालकांना केवळ गोष्टी, गाणी, छोट्या कविता आणि पोषण आहार देण्यात येत होता. आता एवढ्यावर सीमित न राहता अंगणवाडीतील बालकांसाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम राज्य शिक्षण संशोधन मंडळ आणि युनिसेफ यांनी संशोधन करून खास अंगणवाडीतील बालकांसाठी तयार केला आहे. अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना या अभ्यासक्र मानुसार अध्यापन करण्यात येणार आहे. या अभ्यासक्र माची पुस्तके आणि अन्य साहित्य सरकारकडून अंगणवाडी सुपरवाईजर आणि सेविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यासक्रम कशा पध्दतीने बालकांना शिकवावा यासाठी पहिल्या टप्प्यात सुपरवाईजर यांना आणि त्यानंतर सेविका यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या ८ तारखेपासून लोणी येथे या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात १८० सुपरवाईजर असून त्यापैकी १५० सुपरवाईजर यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर पद्वीधर आणि चांगले काम असणाऱ्या सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी मनोज ससे यांनी सांगितले. सुपरवाईजर यांना देण्यात येणारे प्रशिक्षण हे प्रत्यक्षात कृतीवर आधारित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यातील पाच जिल्ह्यात हा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. त्यात नगरचा समावेश आहे.
अंगणवाडीतील बालकांना मिळणार ज्ञानाचे धडे
By admin | Published: August 05, 2016 11:41 PM