लोकमत थेट संवाद / सुधीर लंके । मुंबई : बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला हे माहित नाही. आपण मात्र पक्षाने दिलेला आदेश पाळत नगरचे पालकमंत्रिपद सांभाळणार असून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याला न्याय देऊ, असे नगरचे पालकमंत्रीहसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मुंबई येथे झालेल्या लोकमत सरपंच अॅवॉर्ड कार्यक्रमास मुश्रीफ हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.कोल्हापूर जिल्ह्यातील मुश्रीफ यांच्याकडे नगरच्या तर थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र आपणाकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको अशी भूमिका थोरात यांनी घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत मुश्रीफ यांना छेडले असता ते म्हणाले, थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला? याची आपणाला कल्पना नाही. आपली स्वत:ची मात्र नगरचे पालकमंत्री पद स्वीकारण्याची तयारी आहे. आजवर पक्षाने दिलेला आदेश आपण पाळत आलो आहोत. नगर हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून येथे राष्ट्रवादीचे आमदारही सर्वाधिक आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासात आपण पूर्णपणे योगदान देऊ. मी केवळ राष्ट्रवादीचा पालकमंत्री राहणार नसून महाआघाडीतील घटक पक्षांसह सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कामकाज केले जाईल. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सर्व तालुक्यांना न्याय मिळेल, असे धोरण घेतले जाईल. नगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. त्यापैकी थोरात हे ज्येष्ठ आहेत तर शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे यांच्याशी आपले चांगले संबंध असून त्यांच्याशी संवाद उत्तम राहील याचीही आपण खबरदारी घेऊ. शिवसेना हा आमच्या आघाडीतील महत्वाचा घटक असल्याने त्यांनाही सोबत घेतले जाईल, असे ते म्हणाले.
सर्वांना सोबत घेऊ, नगर जिल्ह्याला न्याय देऊ- हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:41 PM