कोमात राहण्यापेक्षा आमच्यासोबत या : प्रकाश आंबेडकरांचे आघाडीला आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:42 AM2019-03-02T11:42:05+5:302019-03-02T11:42:15+5:30
काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे,
अहमदनगर : काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चौकशा लावून त्यांना कोमात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे़ त्यासाठी चौकशीचे उंदीर बाहेर काढत आहे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास तुमचा कोमा कायचा काढून टाकू, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नगर येथे केले़
वंचित बहुजन आघाडीच्या येथील क्लेराब्रुस मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी लक्ष्मन माने, किसन चव्हाण, अरुण जाधव, किसन चव्हाण आदी उपस्थित होते़ भाजपसह काँग्रेस आघाडीवर आंबेडकर यांनी जोरदार टीका केली़ ते म्हणाले, देशभरातील वंचितांची मूठ बांधण्याचे काम सुरू केले़ त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे़ काहीजण सांगतायेत की बहुजन वंचित आघाडीला भाजपाचा छुपा पाठिंबा आहे़ सत्तेसाठी भाजपची ही खेळी आहे, पण मी त्यांना सांगून इच्छितो की, आम्ही कधी आरएसएसच्या नेत्यांबरोबर बसलो नाही़ परंतु तुम्ही सत्तेसाठी कुणासोबतही जायला तयार आहात़
पंतप्रधान नरेंद्र मोदी जस-जशी निवडणूक जवळल येईल, तस-तसे चौकशीचे उंदीर हळूच बाहेर काढतील आणि बघा यांनी किती भ्रष्ट्राचार केला आहे, हे ते देशाला सांगतील़ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही आवाज तर त्यांनी दाबलाच आहे़
आता बारामतीकरांचाही आवाज ते दाबणार आहेत़ त्यासाठी सरकारने बारामतीचा दाऊद नावाचा उंदीर बाहेर काढला आहे़ त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसही कोमात जाईल़ अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना सरकार शेवटपर्यंत कोमात ठेवेल, असे भाकितही आंबेडकर यांनी केले़ यावेळी किसन चव्हाण, अरुण जाधव यांची भाषणे झाली़ सूत्रसंचालन संजय चव्हाण यांनी केले़
निवडणुकीतून आरएसएसचा खात्मा करा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रडणे, हसणे, लढाई युध्द काहीच खरे नाही़ देशाचे सूत्र नागपूरातून हालविले जात आहेत़ देशाची लोकशाही झारीतील शुक्राचार्यांच्या हाती आहे़ त्यांचे अस्तित्व धोक्यात आले की सर्वप्रथम जात बाहेर काढतात़ त्यानेही प्रश्न सुटला नाही तर धर्म बाहेर काढतात़ धर्मानेही प्रश्न सुटत नसल्याने ते आता देश संकटात असल्याचे सांगत आहेत़ देशावर कुठलेही संकट नाही़ असे असताना युध्दाचे कारण पुढे करून ते देशात आणीबाणी जाहीर करू शकतात, अशी भीती लक्ष्मण माने यांनी व्यक्त केली़
भाजपकडून कारवायांचे मार्केटिंग
पाकिस्तानवर यापूर्वी भारताने अनेक मोठ्या कारवाया केल्या़ पण त्याचे मार्केटिंग कधीही केले नाही़ भाजप सरकारकडून मात्र पाकिस्तानी कारवायांचे जबरदस्त मार्केटिंग केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नगर येथे केला़
वंचित बहुजन आघाडीच्या येथील क्लेराब्रुस मैदानावर झालेल्या सत्ता परिवर्तन सभेत ते बोलत होते़
यावेळी लक्ष्मण माने, किसन चव्हाण, अरुण जाधव, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते़ भारत- पाकिस्तान कारवायांवरून आंबेडकर यांनी भाजप सरकारावर टीकेची झोड उठविली़ ते म्हणाले़, पाकिस्तान तिकडे बसून देशाची खोड काढतो आहे़ त्याविरोधात लढण्याचे ठोस धोरण सरकारकडे नाही़ पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज आहे़ त्यासाठी हिंमत लागते़ ती आपल्या देशाचे ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही़ सर्जिकलस्ट्राईकचाही काहीही परिणाम झालेला नाही़ पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला़ या कारवाईचे स्वागतच आहे़ पण, खरोखर हवाई हल्ल्याची गरज होती का ? मिसाईल टाकणेही शक्य होते़ पण तसे न करता हवाई हल्ला केला गेला़ विमाने पाकिस्तानात घुसविली़ मग माघार का घेतली? लढाई सुरूच ठेवायला हवी होती़ जोपर्यंत शेवटचा मरत नाही, तोपर्यंत कारवाई सुरूच राहिली असती तर पाकिस्तानला जरब बसली असती़ परंतु, तसे केले नाही़ त्यामुळे पाकिस्तानची हिमंत वाढली आहे़ परिणामी या कारवाया आपल्या बाजूने कमी, विरोधात जास्त गेल्या आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली़