अकोले : येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाला लागलेल्या आगीत संगणक प्रयोगशाळा खाक झाली. शनिवारी आमदार किरण लहामटे यांनी पाहणी करून आगीच्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी संगणक प्रयोगशाळा पुन्हा उभी करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान विभागाची संगणक प्रयोगशाळा ९ मार्च रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत जळून भस्मसात झाली. या नुकसानीची पहाणी शनिवारी आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी तर शुक्रवारी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली.
आगीत संगणक प्रयोगशाळा जळून खाक झाली ही दुर्दैवी घटना आहे. तालुक्यातील कोणत्याही शिक्षण संस्थेत राजकारण येऊ देणार नाही. तालुक्याचा पालक या नात्याने आपण संगणक प्रयोगशाळा उभारणीसाठी मदत करू, अशी ग्वाही आमदार लहामटे यांनी यावेळी दिली. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून तालुका शैक्षणिक विकास व्हावा, शिक्षण संस्थांमध्ये अकारण राजकारण येऊ देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, रवी मालुंजकर, विकास वंगाळ, अरिफ तांबोळी, उपप्राचार्य डाॅ. संजय ताकटे आदी उपस्थित होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, कैलास वाकचौरे, यशवंत आभाळे, राजू डावरे, प्राचार्य डाॅ.भास्कर शेळके उपस्थित होते.
....
युद्धपातळीवर काम सुरू
आगीच्या घटनेत महाविद्यालयाची मोठी आर्थिकहानी झाली आहे. संगणक संच मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेच्या एम.बी.ए. व एम.सी.ए.च्या संगणक प्रयोगशाळा तातडीने महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ७५ संगणक असलेल्या नवीन प्रयोगशाळेचे काम एम.बी.ए. व एम.सी.ए.च्या इमारतीमध्ये युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या सुसज्ज प्रयोगशाळेचे उद्घाटन १ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील यांनी दिली.
.