शिर्डी : येथील शेळके, शिंदे वस्तीनजीक असलेल्या नगरपंचायतीच्या चेंबरमध्ये गुदमरुन ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्र्दैवी असून, या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली.दरम्यान, या शेतकऱ्यांचा मृत्यू चेंबरमध्ये विषारी वायुमूळे गुदमरून झाला असल्याचे पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील व तहसीलदार सुभाष दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले़ याशिवाय यातील जखमी सचिन नाईकवाडी यांची प्रकृती सुधारत असल्याचेही सांगण्यात आले़विखे यांनी शिर्डी येथे जाऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहितीही जाणून घेतली. शांतीनाथ आहेर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे, शहराध्यक्ष रतीलाल लोढा, नितीन कोते, तहसीलदार सुभाष दळवी, पोलीस उपअधीक्षक विवेक पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते. चारही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून झालेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करतानाच आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर असल्याचे आश्वासित केले. या सर्व कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्याबाबतचे प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने तातडीने पाठवावेत. मंत्रालय स्तरावर आपण त्याचा पाठपुरावा करु. शासन मदतीबरोबरच शिर्डी संस्थानच्या माध्यमातूनही कशी मदत करता येईल, याबाबतही सहानुभूतीने प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ शेतकऱ्यांना मुख्यमंत्री निधीतून मदत करू
By admin | Published: June 26, 2016 12:25 AM