अकोले : निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी नेण्याची शासनाला घाई झालेली आहे. परंतु, कालवाबाधितांचे व निळवंडे धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. धरणग्रस्त व कालवाबधितांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करून कालव्याची कामे पुढे रेटली तर प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत काँग्रेसचे मीनानाथ पांडे व पाटीलबुवा सावंत यांनी महाआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा दौरा व अधिकाऱ्यांसमवेत बैठका झाल्या आहेत. परंतु, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. अद्यापही घरांचा व पिकांचा मोबदला दिलेला नाही. अजूनही काही जमिनींचे भूसंपादन बाकी आहे. भूसंपादनाचे पैसे तालुक्यात येऊन ते वाटण्याचे महसूल विभागाने मान्य केले होते. कालव्यामध्ये संपादित जमिनीच्या झालेल्या चुकांच्या दुरुस्त्या करून सातबारा दुरुस्त करण्याचेही मान्य केले होते. यापैकी काहीही झाले नाही. तसेच जलसंपदा खात्याकडेही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मंत्रालय पातळीवर यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कालव्यांची कामे बंद पाडू, असा इशाराच दिला आहे.