कोपरगाव : राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यामुळे लाभधारकांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा होणार असून बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करून घ्यावे, असे आवाहन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी केले आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी रिक्षा परवानाधारकांच्या खात्यावर ही रक्कम थेट जमा करता यावी यासाठी परिवहन विभागाने जारी केलेल्या संकेतस्थळावरून अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.
चालकांना आपला आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी. त्यानंतर पडताळणी झाल्यानंतर बँक खात्यामध्ये रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा होईल, असे सालकर यांनी सांगितले.
रिक्षाचालकांचा लॉकडाऊनच्या आर्थिक पॅकेजमध्ये समावेश करावा यासाठी संघटनेचे संस्थापक शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, राजेंद्र सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली अस्लम शेख, पोपट झुरळे, गोकुळ हंडोरे, मधुकर जाधव, सुनील तांबट, पापा तांबोळी, अनिल वाघ आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते.
----