अहमदनगर : स्वस्त धान्य दुकान एकाच्या मालकीचे आणि चालविणारे मात्र दुसरेच आहेत, असे आढळून आलेल्या १५० स्वस्त धान्य दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी निलंबित केले आहेत. पॉज मशीनमधील रेकॉर्डच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त दुकाने ताब्यात घेऊन काळ्या बाजारास वाव देणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई झाल्याने अनेक दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात १,४०० स्वस्त धान्य दुकाने आहेत. या धान्य दुकानांमधील धान्याची विक्री सुरू करण्यापूर्वी दुकानदारांना पॉज मशीनवर अंगठा देऊन दुकान सुरू करता येते. दुकानदार गावाला किंवा इतर ठिकाणी गेल्यास त्यांच्या घरातील रक्ताचे नातेवाइकांना डीलर नॉमिनी म्हणून अधिकार बहाल केले जातात. तेही अंगठा देऊन पॉज मशीन सुरू करून धान्याचे वितरण करू शकतात. मात्र डीलर नॉमिनी म्हणून एकापेक्षा इतर चार-चार जणांची नावे देण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले. परवाना असलेल्या दुकानदारांना त्यांच्या घरातील व्यक्तींनाच डीलर नॉमिनी म्हणून अधिकार देता येतात. मात्र, घरातील व्यक्तींशिवाय अनेकांना डीलर नॉमिनी दिल्याने, एकाच व्यक्तीच्या नावाखाली अनेक दुकाने असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा दुकानांचे परवाने ऑनलाइन रेकॉर्डच्या आधारे निलंबित करण्यात आले आहेत.
----------
पॉज मशीनच्या ऑनलाइन रेकॉर्डवर असलेल्या माहितीच्या आधारे, ज्या दुकानदारांनी डीलर नॉमिनी म्हणून रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त लोकांची नावे दिलेली आहेत, तसेच अशा नॉमिनी व्यक्तींची संख्या जास्त असल्याचे आढळून आले. त्यानुसार, सदरची स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्यात आली आहेत. निलंबित करण्यात आलेल्या दुकानांची संख्या प्रत्येक तालुक्यात १० ते १२ अशी आहे.
-जयश्री माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी
-----------------
काळ्या बाजाराला वाव
काही तालुक्यातील अनेक दुकाने एकाच व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे पुरवठा विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. अशा व्यक्ती धान्याचे वितरण करीत नाहीत, तसेच लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन निम्मेच धान्य वाटप करीत आहेत. याबाबत अनेक तक्रारीही पुरवठा विभागाकडे आल्या आहेत. निम्मे धान्य वाटप करून निम्म्या धान्याचा काळा बाजारही सुरू आहे. काळ्या बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा स्वस्त धान्य दुकानदारांची दहशत असल्याचेही आढळून आले आहे. अशा प्रकारात सध्या शेवगाव तालुका आघाडीवर असल्याचे एकूणच सुरू असलेल्या गोंधळावरून स्पष्ट झाले आहे.