कोपरगाव : नाशिक धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून रात्री दहा वाजता २ लाख ९१ हजार इतके क्युसेक पाणी सोडल्याने गोदावरीने रुद्रावतार धारण करत पूररेषा ओलांडून कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.रविवारी कोपरगाव शहरातील नदीकाठचे बाजारतळ, इंदिरानगर, गोरोबानगर, दत्तनगर, महादेवनगर, सर्वे न १०५, मोहिनीराजनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने रविवारी दुपारपासूनच येथील १०० ते १२० कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सायंकाळी शहरातील नदीवरील पूल पाण्याखाली गेला तसेच शहरातील खंदकनाल्याला देखील पूर आल्याने रात्री उशिरा शहरात पाणी शिरले होते.तालुक्यातील गोदावरी काठच्या ८ गावातील ५९ कुटुंब व २९५ व्यक्ती ग्रामपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा, मित्रमंडळ, सामाजिक संस्था यांच्या मदतीने नदीकाठी पूररेषेत असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवून राहण्याची व्यवस्था केली. प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गोदावरी नदीवरील मंजूर येथील बंधाऱ्यांचा भराव वाहून गेल्याचे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पूरपरिस्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, समन्वयक सुशांत घोडके यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती.दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष तसेच त्यांच्या यंत्रणेमार्फत नागरिकांची मदत सर्वच मदत केली.गोदावरी काठच्या श्रीरामपूर तालुक्यातील ६ गावातील १६३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नेवासा तालुक्यातील घोगरगावमधील 27 कुटुंब 157 लोकसंख्या, जेनपूर-75 कुटुंब 263 लोकसंख्या, सुरेगाव-8 कुटुंब 32 लोकसंख्या, उस्थळ-3 कुटुंब 13 लोकसंख्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित केली आहे. राहाता तालुक्यातील १४१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
गोदावरीला महापूर आल्यानं जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 10:58 PM