संगमनेर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि दहा हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी गुरूवारी (दि. ६) हा निकाल दिला.
प्रकाश नामदेव धांडे (रा. आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध २०१८ मध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १२ नोव्हेंबर २०१८ ला जवळे बाळेश्वर येथे प्रकाश धांडे याने त्याची पत्नी शांता धांडे यांचा खून केला होता. मयत शांता धांडे यांच्या आई गंगूबाई महादू तिटकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी धांडे विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक ए. एस. भुसारे, पोलिस उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यात गंगूबाई तिटकारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिमा लोहारे आदींची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून आर. व्ही. भुतांबरे यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस उपनिरीक्षक विजय परदेशी, पोलीस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉस्टेबल स्वाती नाईकवाडी, प्रतिभा थोरात, पोलिस कॉस्टेबल विक्रांत देशमुख यांचे सहकार्य लाभले.