शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: वडिलांना मारहाण करत त्यांचा खून करून मृतदेह दगडाला बांधून घराशेजारी असलेल्या विहिरीत फेकून देत पुरावा नष्ट करणाऱ्या मुलाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी गुरुवारी (दि.०५) हा निकाल दिला.
काळू रामदास घाणे (वय ३१) असे शिक्षा सुनावलेल्या मुलाचे नाव आहेत. त्याने त्याचे वडील रामदास लक्ष्मण घाणे (बोरवाडी, वारंघुशी, ता. अकोले) यांचा खून केला होता. या प्रकरणी आरोपी काळू घाणे याच्या विरोधात त्याचा मोठा भाऊ राजू रामदास घाणे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर (ता. अकोले) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
राजू घाणे हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहत असताना त्यांच्या घराशेजारी त्यांचे वडील रामदास घाणे, आई जनाबाई तसेच त्यांच्यात त्यांचा मधला भाऊ काळू घाणे हा राहत होता. रामदास घाणे आणि त्यांची पत्नी जनाबाई हे त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी नाशिक येथे गेले होते. त्यावेळी काळू घाणे याने घरातील तीन शेळ्या, दोन बोकड विकून टाकले होते. १९ फेबुवारी २०२२ ला दुपारी काळू घाणे हा त्याच्या वडिलांकडे पैसे मागण्यासाठी आला होता. त्यावेळी वडिलांनी त्याला विचारले की, ‘तू शेळ्या का विकल्या व त्या पैशांचे काय केले.’ या कारणावरून राग आल्याने त्याने वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. लाकूड डोक्यात मारल्यानंतर वडील खाली पडले, त्यांना मारहाण होताना सोडविण्यासाठी गेलेल्या आई आणि बहिणीला काळू घाणे याने वडिलांबरोबर तुम्हालाही मारून टाकीन, अशी धमकीही दिली होती. वडील घरात तसेच पडले असताना त्याने वडिलांना दगड बांधून विहिरीत टाकले होते.
याबाबत राजू घाणे यांना समजल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांनी तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले, न्यायाधीश घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारी वकील म्हणून ॲड. बी. जी. कोल्हे यांनी काम पाहिले. एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. काेल्हे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश घुमरे यांनी आरोपी काळू घाणे यांना शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस कॉस्टेबल स्वाती नाईकवाडी यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे, सहायक फौजदार रफिक पठाण, महिला पोलिस कॉस्टेबल नयना पंडित, दीपाली रहाणे यांचे सहकार्य लाभले.