या खटल्याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
आरोपीचे नाव विशाल प्रदीप तोरणे असे आहे. त्याचे पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या महिलेचा पती संबंधास अडथळा ठरत होता. त्यातूनच तोरणे याने त्याची हत्या केली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एप्रिल २०१८ मध्ये मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तोरणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशाल तोरणे याच्या घरी पत्नीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पतीला तोरणे याने लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यात महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी खुनाच्या घटनेचा तपास केला. पोलिसांनी मयत व आरोपीचे कपडे जप्त केले. लाकडी दांडके नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने तेरा साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. घटनास्थळाचे पंच, तपासी अधिकारी, प्रत्यक्ष साक्षीदार, छायाचित्रकार व शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष नोंदविण्यात आली होती. बचाव पक्षाच्या वतीने स्व-संरक्षणार्थ आरोपीने कृत्य केल्याचा दावा करण्यात आला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. या खटल्यात मयत इसमाच्या पत्नीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. प्रसन्न गटणे यांनी बाजू मांडली. त्यांना विलास घाणे यांनी साहाय्य केले.