सन्मतीवाणीदया ही धर्माची जननी आहे. दया ही अंतरंगातून हवी. सर्वांच्या हृदयात दया असते पण ती प्रकट करण्याचा प्रयत्न केला जात नाही. दया ही सहजवृत्ती आहे तर धर्म हे जीवनाचे अंग आहे. अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची गरज आहे.दया माणसाच्या स्वभावात परिवर्तन घडविते. दया हृदय परिवर्तन देखील करु शकते. जीवन सुखद करण्यासाठी दया आवश्यक आहे. ज्यांच्या हृदयात सरलता आहे. तेथेच धर्माचे वास्तव्य असते. पाणी हे प्रवाही असते. पाण्यात कोणताही पदार्थ सामावून घेण्याची शक्ती असते. दयाळू माणसाच्या हृदयात धर्म वास करतो.धर्मामुळे असत्य दूर होते. स्वभाव बदलतो, प्रत्येक माणसाने भूतदया दाखविण्याची आवश्यकता आहे. भूतदया दाखविणे हाच खरा धर्म मानला जातो. सर्व प्राणीमात्रांवर समान प्रेम करण्यातच आपले हित आहे. ज्याच्या हृदयात दयाच नाही तो दुर्जन समजावा असे संत तुकाराम महाराज म्हणतात. पित्याने आपल्या सर्व मुलांवर समान प्रेम करावे. ज्या ठिकाणी मर्यादा आहे तेथेच धर्माचे अस्तित्व असते. ज्या ठिकाणी अधर्म असतो तेथे सुख, शांती नसते. परिवारात प्रेम, स्नेह जपला पाहिजे. तपसाधनेमुळेच मानसिक स्वास्थ्य ठीक राहते. आईचे मुलांबद्दलचे वात्सल्य अमोल असते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. जोपर्यंत अंतरंगात दयेचा दिवा प्रकट होत नाही तोपर्यंत जीवनाला जीवन म्हणता येणार नाही. दया नसेल तेथे अधर्म असतो. तो दूर करण्यासाठी अंतरंगात दयेचा दिवा पेटविण्याची आवश्यकता आहे.-प.पू.सन्मती महाराज.
अंतरंगात दयेचा दिवा पेटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:25 PM