अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या काळात दुकाने, हॉटेल, बाजारपेठा बंद असल्याने कचऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. लॉकडाऊन नसताना दररोज १५० टन कचरा जमा होेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यात घट होऊन सध्या दररोज १२० ते १२५ टन इतका कचरा जमा होत आहे.
शहर व परिसरातून दररोज दीडशे टनाहून अधिक कचरा जमा होत असतो. कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने वाहने खरेदी करून ती ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. कचरा संकलन होत नसल्याच्या अनेक तक्रारीही महापालिकेत होत होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात पहिल्या लाटेत कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. मागील वर्षीही हे कचऱ्यांचे प्रमाण घटले होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला कचरा ठेकेदाराने लॉकडाऊनच्या काळात उचलला. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला दिसणारे कचऱ्याचे ढीग कमी झाले आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने १५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्यात महापालिकेने कडक पावले उचलत वैद्यकीय सेवा वगळता सर्व किराणा, भाजीपाला, बाजारपेठा, हॉटेल, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व शहरात ३ मेपासून कठोर निर्बंध लागू केल्याने भाजीबाजार, हॉटेल आणि बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्यांचे प्रमाण घटले असून, महापालिकेवरील भारही कमी झाला आहे. कचरा संकलनात २५ टनांची घट झाली आहे. घरोघरी जाऊन संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यातही घट झाली असल्याचे महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.
....
जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ
कोरोनाच्या काळात वैद्यकीय कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना नसताना दररोज ४०० ते ५०० किलो जैववैद्यकीय कचरा संकलित होत होता. सध्या दररोज दीड टन जैववैद्यकीय कचरा जमा होत आहे. हा कचरा कोरोना रुग्णालयातील असल्याने तो जाळून त्यापासून तयार झालेली राख कारखान्यांना पुरविली जात असल्याचे सांगण्यात आले.
...
पीपीई किट कमी झाले, काचेच्या बाटल्या वाढल्या
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट मोठ्या प्रमाणात जमा हाेत होते. परंतु, दुसऱ्या लाटेत पीपीई किट वापराचे प्रमाण कमी होऊन काचेच्या बाटल्यांचे प्रमाण वाढले आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
....
- कोरोनामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने, हॉटेल, भाजीबाजार, बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण घटले असून, सध्या ११८ ते १२५ टनापर्यंत कचरा जमा होत आहे.
-किरण देशमुख, स्वच्छता निरीक्षक, महापालिका