पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील मठवस्तीवर दोन दिवसांपासून वीज नसल्याने संपूर्ण वस्ती अंधारात आहे. दोन दिवसांपूर्वी येथील विद्युत रोहित्र जळाल्याने हा खोळंबा झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासही बंद आहे.
वीज नसल्याने येथील वस्तीवरील नागरिकांना पाण्यासाठीही दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. संपूर्ण वस्तीसाठी एकच रोहित्र असल्याने त्यावर अतिरिक्त दाब असून वीज पुरवठा खंडीत होतो. शिवाय महामार्गालगत हाॅटेलची संख्याही जास्त आहे. त्यामुळे अतिरिक्त वीज लागते. त्यातून वीज पुरवठा खंडीत होत आहे.
महामार्गालगत दोन्ही बाजूला दोन अशा वेगवेगळे रोहित्राची महावितरणने व्यवस्था करावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी संजय तरटे यांनी केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय असल्याने सध्या कांदा, ज्वारी भरणे लांबल्याने पीके सुकू लागली आहेत. यासंदर्भात वीज कार्यालयाशी संपर्क केला असता अजून दोन दिवसांनी रोहित्र मिळणार असल्याचे अभियंता रुद्राकर यांनी सांगितले.