केडगाव : नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीने कांदा व डाळींबाच्या आवक मध्ये उच्चांक गाठला आहे. बाजार समितीमध्ये शेतक-यांच्या सोयीसाठी तसेच फळाचे मार्केट वाढावे, यासाठी लवकरच लिंबू व संत्राचे लिलाव सुरू करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांनी दिली.नेप्ती उपबाजार समिती येथे डाळिंबाची आवक वाढली असून येथे साई नगरी फ्रुट आडत नव्याने सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी शिंदे यांनी हि माहिती दिली. यावेळी शिंदे म्हणाले, मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाने संगमनेर, राहाता, नाशिक येथील बाजार समिती मध्ये जाऊन तेथील कारभार पहिला. या समितीमध्ये नगर, पारनेर, पाथर्डी येथील शेतक-यांचे डाळिंब दिसून आले. जवळपास साठ टक्के डाळिंब आपल्या हक्काचा बाहेर जात असल्याचे लक्षात आले. संगमनेर येथील आडत व्यापारी यांच्याशी चर्चा करून नगर येथे आडत चालू करण्याबाबत चर्चा झाली. यामुळे येथे फळांचे मार्केट सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी दशमी गव्हाण येथील शेतकरी विजय काळे यांच्या डाळींबला १०५ रुपये किलोचा उच्चांकी भाव मिळाला. यावेळी संदिप कर्डिले म्हणाले, नगरचे कांदा मार्केट महाराष्ट्रातील पहिल्या पाच क्रमांकात आहे. येथे शेतक-यांना चांगल्या सुविधा देण्यात येत असल्यामुळे हि बाजार समिती नावारूपाला आली. कांदा, डाळिंबाची आवक वाढत चालली आहे. डाळींबसाठी एक वेगळे शेड उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नामदेव सरोदे, मिलिंद आंबरे, आप्पा वाकचौरे, योगेश आंबरे, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, बाबासाहेब खर्से, कानिफनाथ कासार, जगन्नाथ मगर, बन्शी कराळे, बाळासाहेब निमसे, जालिंदर वाघचौरे, आनंदराव आव्हड, शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, बहिरू कोतकर उपस्थित होते.