मच्छिंद्र देशमुख -
कोतूळ (जि.अहिल्यानगर) : ‘शेर कभी घास नहीं खाता’ अशी म्हण प्रचलित आहे. वाघ किंवा तत्सम जंगली प्राणी आपली शिकार जंगलातच शोधतात, हे या म्हणीतून प्रतीत होते, पण हल्ली अन्नाच्या शोधात बिबटे चक्क कचराकुंड्या, उकांडे चाचपडू लागल्याचे धक्कादायक चित्र अकोले तालुक्यात दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले या तालुक्याच्या शहरात कचरा डेपोवर रात्री बिबटे दिसतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. तसे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
कुत्रे दिवसा तर बिबटे रात्री येऊन पिशव्यांतील खाद्य शोधतातकोतूळ येथील एक शेतकरी अविनाश शिंदे यांनी वेगवेगळ्या दिवशीचे व्हिडीओ तयार केले आणि बिबटे प्लास्टिकच्या पिशव्या फाडून त्यातील फेकलेले चिकन, मटण खातात हे समोर आले. आणखी कुठे हा प्रकार आहे का? यावर ‘लोकमत’ने पडताळणी केली. कोतूळ येथील चिकन व्यापारी आसिफ पठाण यांनीही कोतूळ येथे कचरा डेपोवर बिबटे येतात हे खात्रीने सांगितले.
भटकी कुत्री कचराकुंडीवर येतात, पण काही दिवसांपासून बिबटे येत असल्याने कुत्र्यांची संख्या कमी झाली. बिबटे थेट कुत्र्यांची शिकार करू लागल्याने, आता कुत्रे रात्री न येता दिवसा कचराकुंडीवर येतात, तर बिबटे रात्री येऊन प्लास्टिकच्या पिशव्यांतील मांस शोधतात, असे चित्र दिसले. काही दिवसांपूर्वी अकोले शहरात बंद घरात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला, तसेच कोतूळ गावात मध्यवस्तीत बंद घरात आराम करताना बिबट्या आढळला.
काय आहे तज्ज्ञांचे मत?रान बिबटे व ऊस बिबटे (गाव बिबटे) असे दोन गट आहेत. रान बिबटे स्वतः शिकार करतात. ऊस बिबटे पंधरा-सोळा महिने उसात राहतात व जवळच्या वस्तीतील जनावरे, कुत्रे यांना भक्ष्य करतात. शेतकरीही जनावरांची काळजी घेऊ लागले आहेत. बिबटे कचराकुंडीवर येत असतील, असे तज्ज्ञ सांगतात.
बिबटे सहसा उष्टी शिकार खाताना आढळत नाहीत. कुत्रेही टोळ्या करून राहत असल्याने बिबट्यांना अन्नासाठी कचराकुंडीवर यावे लागत असावे. दत्तात्रय पडवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अकोले.