अहमदनगर : महापालिकेने बड्या थकबाकीदारांची नावे वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत. डॉक्टर, उद्योगपती, राजकारणी, मंगल कार्यालये, शासकीय कार्यालये आणि दूरसंचार कंपन्यांचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. महापालिकेच्या १७० कोटी रुपयांच्या असलेल्या थकबाकीपैकी ३२ कोटीची वसुली झाली असून उर्वरित १३६ कोटी रुपये वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी वसुलीचा फास प्रशासनाने आवळला आहे. अनेक आयुक्त आले नि गेले पण थकबाकी पूर्णपणे वसुलीत एकालाही यश आले नाही. त्यामुळे महापालिकेची थकबाकी वर्षानुवर्षे वाढतच गेली. यंदा थकबाकीचा आकडा १७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महापालिकेने शास्तीमाफीची सवलत देऊनही वसुलीस प्रतिसाद मिळत नाही. ११ महिन्यात ३२ कोटी १४ लाख रुपये वसुली झाली. त्यात १८ कोटी रुपये चालू वसुली आहे. अजूनही नगरकरांकडे महापालिकेचे १३६ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीत मोठे उद्योगपती, राजकारणी, डॉक्टर्स, मंगल कार्यालये, शासकीय निवासस्थाने, एस. टी. महामंडळ, आयकर विभाग, बांधकाम विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालये, बिल्डर यांचा समावेश आहे. त्यांची नावेच महापालिकेने वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत. वसुलीसाठी लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असलेल्या थकबाकीदारांच्या दारात तृतीयपंथीय पथकामार्फत वसुली केली जाणार आहे. वसुली होत नाही तोपर्यंत हे पथक तेथून हलणारच नाही. तशी मोहीम सुरू केली जाणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. याशिवाय नळजोड तोडले जाणार असून जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
थकबाकीदारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 10:34 PM