अहमदनगर : शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निवडीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. जिल्ह्यातून ५३६ अवघड क्षेत्रातील शाळांची यादी शिक्षण विभागाला प्राप्त झाली असून समितीमार्फत पडताळणी करून अंतिम शाळांची निवड होणार आहे.
वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, बदल्यांची प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास ऐनवेळी अडचण नको, यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. त्यानुसार १४ तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला सादर केली असून यात ५३६ शाळांचा समावेश आहे. आता अवघड क्षेत्रातील शाळांसाठी नेमलेल्या समितीमधील विभाग यादीतील शाळांची पडताळणी करणार असून त्यानंतर जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या निश्चित होणार आहे.
जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), कार्यकारी अभियंता (जिल्हा परिषद बांधकाम विभाग), विभाग नियंत्रक (राज्य परिवहन मंडळ) आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे सदस्य आहेत.
बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांची बैठक झाली. यावेळी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, एसटीचे विभाग नियंत्रक विजय गीते, जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हजर होते. उपवन संरक्षक मात्र बैठकीला गैरहजर होते. ही समिती आता मिळालेल्या यादीतून अवघड क्षेत्र शाळांची नावे अंतिम करणार आहे.
अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी शासनाने सात निकष दिलेले आहेत. या सातपैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणा-या शाळांची निवड अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये होणार आहे. २०१८ मध्ये अशा प्रकारे ४७८ शाळांची यादी जिल्हा परिषदेला पाठविल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाला १४ तालुके वाटून देऊन त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत जिल्ह्यात ३६८ शाळा अवघड क्षेत्रात अंतिम झाल्या होत्या. यंदा किती शाळा अंतिम होतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.