अहमदनगर : झी सारेगमपची लिटिल चॅम्प अंजली अंगद गायकवाड हिचा महापालिकेतर्फे गौरव करण्यात आला. तिच्या पुढील सांगितिक वाटचालीसाठी एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा महापौर सुरेखा कदम यांनी केली. यावेळी ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडती गाठी’ या नाट्यगीताने तिने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.‘झी सारेगमप’ या राष्ट्रीय स्तरावरच्या संगीत स्पर्धेची मराठमोळी अंजली विजेती ठरली. तिच्यासह बहीण नंदिनी, आई-वडील मनीषा व अंगद गायकवाड यांचा महापालिकेतर्फे गुरुवारी गौरव करण्यात आला. यावेळी सभागृह नेते गणेश कवडे, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भूतकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, महापालिकेतील शिवसेनेचे नेते संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे, मनीषा बारस्कर-काळे, छाया तिवारी, दीपाली बारस्कर, वीणा बोज्जा, मुदस्सर शेख, बाबासाहेब वाकळे, दिगंबर ढवण, काका शेळके, दीपक खैरे, हनुमंत भूतकर, किसनराव भिंगारदिवे, सुरेश तिवारी, श्रीनिवास बोज्जा, संतोष गेनाप्पा, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.यावेळी महापौर कदम म्हणाल्या, अंजली हिने मिळविलेल्या संगीत स्पर्धेतील यशामुळे नगरचे नाव उंचावले आहे. तिच्या यशाने नगरचे नाव संपूर्ण देशभरात झळकले, ही नगरकरांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. अंजलीसोबत नंदिनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. तिला संगीतामध्ये प्रोत्साहन म्हणून महापालिका एक लाख रुपये देईल. या रकमेचा धनादेश आठ दिवसांच्या आत तिला मिळेल.सत्काराला उत्तर देताना अंगद गायकवाड म्हणाले, अंजली व नंदिनी यांच्याकडून एखादे कार्य करण्याची ईश्वर इच्छा असावी. मी फक्त एक मध्यस्थ आहे. महापालिकेकडून झालेला गौरव हा घरचा सत्कार आहे.यावेळी अंजली व नंदिनी यांनी ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडती गाठी’ आणि ‘हसता हुआ नुरानी चेहरा’ या गीतांनी दोघींनी सभागृहाला मंत्रमुग्ध केले. मिलिंद वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
२१ हजार रोख
गौरवप्रसंगी उपस्थित नगरसेवकांनी प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची लगेच अंमलबजावणी झाली. २१ हजार रुपयांची रोख रक्कम प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून अंजली व नंदिनीला देण्यात आली.