राहुरी : शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. राहुरी शहरातील डुबीचा मळा परिसरातील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांच्या घराजवळ दि. १३ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेदरम्यान एक बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याचे मंदाताई साठे यांच्या घरासमोरील सीसीटिव्ही कॅमेºयात दिसून आला. यावेळी परिसरातील मोकाट कुत्रे जोर जोरात भुंकत होती. कुत्र्यांचा आवाज ऐकून मंदाताई साठे या घराबाहेर आल्या. यावेळी त्यांना काही अंतरावर बिबट्या दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्या घरात पळून गेल्या आणि दरवाजा बंद करून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी राजेंद्र बोरकर यांना फोन करून बिबट्याची माहिती दिली. बोरकर यांनी काही मित्रांना बरोबर घेऊन परिसरात पाहणी केली. मात्र बिबट्या दिसून आला नाही. यावेळी बोरकर यांनी मंदाताई साठे यांच्या घरासमोरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात बिबट्या दिसून आला. वन्यप्राणी जंगल सोडून मानवीवस्तीत शिरल्याने वनखात्याने तातडीने येथे पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी राजेंद्र बोरकर, जावेद आतार, दिनेश कल्हापुरे, पप्पू कोरडे, शिवाजी काकुळदे, अन्वर आतार, अंकुश कोरडे, सागर खरात यांनी वनविभाग अधिकाºयांची भेट घेऊन केली आहे.
राहुरीत बिबट्याचा संचार; सीसीटिव्हीत बिबट्या कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:21 PM