बोटा : संगमनेर तालुक्यातील केळेवाडी शिवारात भक्षाच्या शिकारीसाठी मागे धावताना विहिरीत पडला. शनिवारी रात्री वनविभाग व ग्रामस्थ यांनी बचावकार्य राबवत जवळपास चार तासानंतर विहीरतून बाहेर काढले.केळेवाडी शिवारातील कोरडेदरा येथे विकास बबन कु-हाडे यांच्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे धावताना त्यांचे शेतातील सुमारे पस्तीस फुट खोल विहिरीत बिबट्या पडला. शनिवारी रात्री नऊच्या सूमारास विकास कु-हाडे हे विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. वनविभागाला माहिती दिल्यानंतर घारगाव वनपरिमंडळचे वनपाल रामदास शेटे, वनरक्षक दिलीप उचाळे, कर्मचारी तान्हाजी फापाळे, अनंथा काळे, बाळासाहेब वैराळ, रवि पडाळे, मुरलीधर वर्पे हे घटनास्थळी आले. पाठोपाठ जेरबंद करण्यासाठी पिंजरा आला. दरम्यान विकास कु-हाडे, बाळासाहेब कु-हाडे, गणेश कु-हाडे, सचिन कु-हाडे, किरण कु-हाडे, अनिल कु-हाडे, संतोष लामखडे यांच्यासह ग्रामस्थही या बचाव कार्यात सहभागी झाले. सुदैवाने विहिरीत केवळ दोन फुट पाणी होते. क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला व जवळपास चार तासानंतर बिबट्या या पिंज-यात जेरबंद झाला. यानंतर बिबट्याला चंदनापुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले. बिबट्या मादी जातीचा दोन वर्षे वयाचा असल्याचे वनपाल शेटे यांनी सांगितले.