लोकमत न्यूज नेटवर्क
--------------
संगमनेर : कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा संसर्ग रोखण्याकरिता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने करणे बंधनकारक आहे. कोरोनाविरोधातील लढाईत योगदान असलेल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे आजवर अनेकांचे जीव वाचले. मात्र, तरुणांच्या बेफिकीरपणाच्या वागण्याने बालके, ज्येष्ठांचा जीव धोक्यात येतो आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक कुटुंबच्या कुटुंब कोरोनाग्रस्त होत आहेत.
राज्यात ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून शनिवार व रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी तरुणांनी या लॉकडाऊनचा पूर्णपणे फज्जा उडविला. विनाकारण घराबाहेर पडणे, हॉटेल, ढाबे येथे जेवणासाठी जाणे, रस्त्यांवर दुचाकी वाहनांचे स्टंट करणे, गल्लीत क्रिकेट खेळणे, घोळक्याने नदीपात्रात, विहिरींमध्ये पोहायला जाणे, दिवस-रात्र कट्ट्यांवर बसणे असे प्रकार सर्वत्र पाहायला मिळत आहेत.
नियमांचे उल्लंघन करत एकत्र येणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढतो आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेकांमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. तरुणांची बेफिकिरी त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व बालकांना भोवते आहे. काळजी घेत घराबाहेर न पडणाऱ्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे हे केवळ डॉक्टर आणि प्रशासनाचे कर्तव्य नसून समाजहितासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
---------
अशी घ्यावी काळजी...
- लहान मुले मास्क ठेवत नाहीत. त्यांना मैदानात खेळायला पाठवू नये, शक्यतो बाहेर नेऊच नये.
- लहान मुले, बालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी.
- नवजात बालकांचे लसीकरण वेळच्या वेळी त्यांच्या वयाप्रमाणे करावे. बीसीजी, एमएमआर या लसींमुळे कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हृदय, किडनी व मेंदूचे आजार तसेच दमा, बालदमा किंवा इतर आजार असलेल्या बालकांना न्यूमोनिया, स्वाईन फ्लूची लस घ्यावी. कोरोनाबरोबरच इतर आजारांपासून बचाव करणे गरजेचे आहे. मुलांना चांगला सकस आहार द्यावा. असे बालरोग तज्ज्ञ व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---------------
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसाराचा धोका अधिक आहे. तरुणांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्यास फारसा त्रास जाणवत नाही. मात्र, त्यांच्यामुळे कुटुंबातील वयोवृद्धांना, आजारी सदस्यांना अधिक त्रास होतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बालकांना फारसा त्रास होत नव्हता. परंतु दुसऱ्या लाटेत बालकांनादेखील त्रास होतो आहे. परिस्थिती बिकट असून ती दोन-तीन आठवडे अशीच राहू शकते. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे घरातच राहा, विनाकारण बाहेर पडू नका. तुमच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर
----------------
पुन्हा होऊ शकतो कोरोना
संगमनेर शहरातील प्रवरा नदी परिसर व इतर ठिकाणी सकाळी, संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात. यातील काही नागरिकांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने कोरोनाच्या गंभीर बनत चाललेल्या परिस्थितीबाबत संवाद साधला. ‘आम्हाला कोरोना होऊन गेला, आम्ही लस घेतली’ असे अनेकांनी सांगितले.
परंतु एकदा कोरोना झाल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो. लस घेतल्यानंतरही कोरोना होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे फिजिशियन डॉ. सुशांत गिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.